महालक्ष्मी
श्री महालक्ष्मी देवीची कहाणी

श्रीगणेशाय नमः । श्रीलक्ष्मी देव्यै नमः ॐ श्री क्लृं ॐ धनद धनं देहिमाम्।

ॐ धनदाय नास्तुभ्यं निधिपद्माधिपायच । भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदः ।।

ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. व्दापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथ एक राजा होता. राजाचं नांव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा-ब्राह्मणांना, साधूसंतांना सुखवीत होता.

राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका, ती रुपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नव-याचं तिचं भांडण होई, घरी वैतागली. गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःखं गेली. दारिद्रय संपल, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरुन! पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजऴलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली. तो-या-ताठ्यानं बोलू लागली. दास-दासींवर खेकसू लागली.

एकदा काय झालं, देवीच्या मवी आलं, राणीला भेटावं. मागची आठवण द्यावी. ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्या मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना सात मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शामबाला.

एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला! हळूहऴू पावलं टाकीत आली, राणीला भेटायला. वाड्याशी आली अन् आरोऴी दिली. "आहे का कुणी घरी? घालील का कुणी घास?" दासी आली बाहेर, म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, "कोण गं तू? कुठून आलीस? काम काय काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला?"

म्हातारी सांगू लागली, हळू आवाजातच. तशात खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, "माझं नाव कमलाबाई, व्दारकेहून आलेय इथं. राणीला भेटायचंय! कुठे आहे या राजाची राणी?" दासी म्हणाली, "राणीसाहेब आहेत महालात! मैत्रिणींशी गप्पा मारताहेत. त्यांना सांगितलं, तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील. उणं-दुणं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेऴ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना!" म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. "तुझी राणी पैशावर भाळलीय! माणुसकी विसरलीय! मागच्या जन्मी होती दरिद्री! आज झाली राणी! पण ती माझ्यामुऴेच! माच तिला देवीचं व्रत सांगितलं. तिनं केलं. आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली! पण देवीची आठवणही नाही तिला! तिला आता संपत्तीचा गर्व झालाय! डोऴ्यांवर पैशांची धुंदी आलीय! गोरगरिबांना कशाला विचारील ती! थोरा-मोठ्यांच्या मुली, मैत्रीणी झाल्या. म्हातारी गरीब! भिकारीण! तिला कोण विचारतोय! ही राणी लक्ष्मीव्रत विसरुन गेली. घेतला वता टाकून दीला. उतली-मातली पण याचं फऴ तिला भोगावंच लागेलय नंतरच डोऴे उघडतील तिचे. जाते मी परत!"

म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरुन एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी-`शामबाला!` ती आली नि कऴवऴून म्हणाली, "आजी, रागावू नका, माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या! मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा." म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया ! ती क्षणभर मुलीकडे डोळे भरुन पाहत होती. तिनं मुलील लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार, तोच राणी तरातरा आली माडीवरुन! दाराशी येते, तर दिसली ती म्हातारी ! राणी कडाडली, "कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथुन. ऊठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला! लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत तुला?"

म्हातारीचे डोऴे गरगर फिरलेय कपाऴावर आठ्या उमटल्या नि तडक ती निघून गेली परत ! पूढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासीपण सोडुन व पुढे सुखानं संसारही सुरु होता. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शामबमलेनं लक्ष्मीव्रत केलं. सगऴे नेमधर्म पाऴून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं.

सिध्देश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्रशी शामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालंय लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला. पण... भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हऴूहऴू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलंय सुरतचंद्रिका राणी होती, ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसऴलं, पण काय? एकेक दिवस चिंतेनं उगवत होती, तसाच मावऴत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती.

भद्रश्रवाला वाटलं, मुलीकडे जावं, तिला पाहावं, तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदीतीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होतीय तिनं भद्रश्रवांना पाहिलं. ओळखलं परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली, मालाधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला. श्वशुरांना घरी आणलं, मान-सन्मान केला. नवी वस्त्र दिली व गऴ्यात हार घातला. शामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते.

आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवऴ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहू ती खुलला. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय? आत दिसले कोळसे! सुरीचंद्रिकेने कपाळावर हात मारुन घेतला. नव-याला सांगितलं, तोही चकित झाला ते ऐकून ! दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवर होते. काळजीचा वणवा भडकत होता! सुरतचंद्रिकेला एकेक दिवत अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला भेटावं. डोऴे भरुन पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत ! दुसरं करणार काय? एका गुरुवारीच ती घरुन निघालीय मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती ! त्या वेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. "तुमची आई नदीवर बसलीय. खूप दमलेली दिसली. तीला आणायला पाठवा कुणीतरी !"

शामबालेनं रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शामबालेनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारलीय घरचं ऐश्वर्य पाहून तीचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते ! आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्यामोत्यांचे अलंकार घातले. आईचं रुप उठून दिसू लागलं.

दुपारची वेळ झाली. शामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीची भक्तीभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप-दीपांचा वास दरळवत होता. शामबलेला उपासच होताय तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून ! आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलावलं आणि.... आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होतीय लक्ष्मीदेवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती. ती म्हणाली. " शामा, मी पण जेवत नाही. मीही तुझ्याबरोबर उपासच करीन !" शामा 'ठीक आहे' म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो ! चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला शामबाला बरोबर गेली होती.

चार दिवस राहून शामबाला परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराशी गप्पागोष्टीत वेळ जात होतो. त्यानं सहज विचारलं. "माहेरुन काय आणलंस? " शामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं झाकण काढलं. आता काय दिसलं त्याला ? मिठाचे खडे !

"अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला ? इथे नाही का मिळत मीठ?"

"हो! मिळतं ना? पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुदाचं आहे हे मीठ ! समुद्रातीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज....?" शामबालेच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती ; पण तो विचारचक्रात गुंतला होता !

शामबाला सांगत होती,"हे मीठ जीवनाचं अमृत आहे ! मिठानं अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव! जो माणूस जिथं मीठ खातो, तो धन्याशी इमानी राहातो, त्याचं रक्षण करतो, कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो." मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं ! त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सास-याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता ! पण अधिक विचार न करतो तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली.

सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपू्र्वक वंदन केले. "काय आज्ञा ?" असं नम्रपणे विचारलं. ! मालाधरानं आज्ञा केली, "भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करुन जायचं ! प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एकेक मिठाचा खडा द्यायचा, शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचं."

राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुस-याच दिवशी राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरु होती. पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा अडवताच येत नव्हता! शत्रूचे सैनिक जमिनवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युध्दाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक इर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी....?

मालाधराच्या सैन्यानं शत्रुचा पुरा फाडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व शामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबोडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रुच्या राज्यातील मुख्या खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होतीय ती पोत्यात भरुन मालाधराकडे आणलीय कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस ! शामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती केली, धूप-दिपाचा सुगंध दरवळत होता.

तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नेवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं ! मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार ! लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहू्र्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा-राणी परत आपल्या सौराष्टात आलीय सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वता घेतला व तो आजन्म पाळला, घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे सात मुलगे दूरदेशी गेले होते, तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई-वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दांत सांगणं अगदी अशक्यच !

श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजाराणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वानाच सुखवीत होते. अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेनं त्याचं घर सदैव फुलावं. अशी पाचा उत्तरांत सुफल संपूर्ण करुन सर्वांनी देवीला वंदन करावं, ही प्रार्थना!

महालक्ष्मी